Saturday, 3 March 2012

कदंबाच्या झाडाखाली...





कदंबाच्या झाडाखाली...

नातं...नातं म्हणजे नेमकं काय हो...जे आपण समजतो...ते का..जे आपण समजावं असं समाज आपल्याला सांगतो ते...नेमकं काय..?...एकूण आपली जडणघडण आणि समाजात असलेलं स्थान पाहिलं तर वर म्हटल्याप्रमाणे दोन्ही...आणि जर एखाद्या नात्यात दोन्ही गोष्टी नसतील किंवा असतील तर म्हणजे काहीसं व्यामिश्र नातं....पण अशी नाती फारशी पाहायला मिळत नाहीत..का हो..?...का आपण त्यांच्याकडे अशा पद्धतीने पाहायचं टाळतो..?...असंच एक काहीसं और नातं मध्यंतरी अनुभवायला मिळालं..अर्थात हे नातं फार पूर्वापार आपल्या सगळ्यांना माहिती आहे...अगदी परंपरागत...हजारो वर्षांपासून ...पण तरीही बऱ्याच वेळेला आणि बऱ्याच अंशी त्या नात्याकडे अगदी पाहावं तसं पाहिलं गेलेलं नाही...मला याचं कारण असं वाटतं..की आपल्यावर तसे संस्कारच केले गेले आहेत...उगाच कशाला रहस्य वाढवायचं...मी बोलतोय राधा आणि कृष्ण यांच्या नात्याबद्दल...या नात्याबद्दल आपण कायम ऐकलेलं असतं...वाचलेलं असतं...पाहिलेलं असतं...आणि त्यानुसार आपण त्या नात्याला जोखतो...त्यांचं अस्तित्व समजून घेण्याचा प्रयत्न करतो...कधी आपल्या संकुचित विचारांनुसार..जडणघडणीनुसार किंवा आपल्या बालसुलभ मनोवृत्तीनुसार...

                     कदंबाच्या झाडाखाली या कार्यक्रमाने मात्र या नात्याबद्दल एक वेगळाच विचार....एक वेगळा पर्सपेक्टीव्ह दिला...नव्हे...अंगात भिनवला...राधा आणि कृष्ण...एक नातं..असं की ज्याला खरं तर शब्दात बांधता येत नाही...आपले शब्द किंवा आपली व्यक्त करण्याची क्षमता त्यांना एक खूप चांगले मित्र मैत्रिण...एक खूप चांगलं युगुल ज्यांचं नातं मित्र आणि मैत्रिणीच्या कक्षेबाहेर जाणारं होतं अशा कक्षेत बांधतात...का ते होते... प्रियकर आणि प्रेयसी...? कुणास ठाऊक..? प्रत्येक नात्यात एक राजकारण आहे असं म्हणतात...खरंतर प्रत्येक नात्यात नाही..तर प्रत्येक गोष्टीत राजकारण आहे असं म्हणतात...there is politics in evrything..almost everything....मग राधा आणि कृष्ण यांच्या नात्यातही असं काही राजकारण होतं...? मग ते आपल्याला का दिसलं नाही...?..का दाखवलंच गेलं नाही....? का कृष्ण हा दैवी अवतार असल्याने त्यानं हे राजकारण फार चतुराईने मॅनेज केलं...केलं असेलंही..शेवटी द्वारकाधिश कृष्ण म्हणजे साक्षात देव...THE..ONE AND ONLY....अशक्य ते शक्य करण्याची कपॅसिटी असलेला...कुठल्याही रजनीकांतच्या किंवा हॉलिवूडच्या फिल्ममध्ये दिसले नसेल असे स्पेशल इफेक्ट्स करुन दाखवण्याची क्षमता असलेला...मग त्याला इतकी साधी गोष्ट जमली नसेल...विचार करण्यासारखी गोष्ट आहे...पण इथेच तर त्यांच्या नात्याची खरी मेख आहे...आपण अपेक्षा करतो किंवा आपण पाहू इच्छितो असं लिनिअर पद्धतीचं त्यांचं नातंच नाहीए...त्याचं नातं आहेच असं काही और..जगावेगळं...भौतिक जगाच्या व्याख्यांमध्ये न बसणारं...भौतिक जगाच्या इच्छा अपेक्षांपेक्षा पूर्णपणे वेगळं....मल्टिलेयप्ड...अर्थात बहुपदरी...बहुआयामी...कदाचित आपणं वाचलं पाहिलं असेल त्यातून आपणंच हे नातं सरधोपट पद्धतीने पाहिलं असेल...आपल्यालाच गरज आहे ते जरा वेगळ्या पद्धतीने पाहण्याची किंवा खरं तर अनुभवण्याची...

                 एखादी गोष्ट मिळाली किंवा पूर्णत्वाला पोहोचली की ती मिळवण्यातली किंवा अनुभवण्यातली गंमत संपते...म्हणूनच का काय एखादं रिलेशनशिप पूर्ण झालं किंवा त्यात गरजेचे असलेले टप्पे पार पडले की मज्जा राहात नाही...म्हणजे आपल्याला गर्लफ्रेंड मिळाली की संपली हो मज्जा..ती मिळवताना केलेले कष्ट किंवा त्यासाठी खालेल्या खस्ता किंवा खरंतर ती मिळवण्यासाठी घेतलेल्या आणाभाका या फक्त नॉस्टॅलजिया पुरत्या ठरतात...म्हणूनच ती मिळत नाही तोपर्यंत मजा असते...किंवा मिळाली नाही तरंच खरंतर मज्जा असते...त्यामुळे ते रिलेशन खऱ्या अर्थानं सजीव, जिवंत किंवा लाईव्ह रसरशीत राहतं...मग ते एकतर्फी प्रेम असो किंवा दुतर्फी..म्हणजे दोन्हीकडून मान्य पण कुठल्या तरी बंधनामुळे किंवा अडचणीमुळे पूर्ण होऊ न शकलेलं...असं प्रेम जास्त काळ स्मरणात राहतं...

                   मुद्दा कदाचित भरकटत असेल पण राधा आणि कृष्णाचं प्रेम मला थोडसं या कॅटॅगरीतलं वाटतं...वेगवेगळ्या स्टेजमधून..वेगवेगळ्या अनुभवातून गेलेलं...वेगवेगळे अँगल दाखवणारं....म्हणजे वेगवेगळ्या गाण्यांमधून किंवा साहित्यातून आपल्याला राधा आणि कृष्णाचं प्रेम दिसतं...आणि त्यातून मिळतो तो प्रेमाचा किंवा अस्तित्वाचा एक रसरशीत हवाहवासा वाटणारा अनुभव..पण तरीही या सगळ्याला विरहाचं एक अंतर्मुख करणारं कोंदण आहे...कारण त्यांच्या या एकत्र येण्याला कुठल्याही नात्यांच्या नावात अडकवता येत नाही...बसवता येत नाही...

                       गोकुळात लहानपणी एकत्र खेळलेले बागडलेले राधा आणि कृष्ण...यातही सगळ्या गोपिकांमध्ये कायमच राधेचं स्थान निराळं...याच निराळेपणातून राधा आणि कृष्ण कदाचित एकमेकांच्या जवळ आले असतील...मग लहानपणाच्या निरागसतेतून अजाणतेपणी नकळत..अगदी हळूवार...हवेत झुलत जाणाऱ्या सुंदर पिसाचा अलगद स्पर्श व्हावा त्याप्रमाणे त्यांच्या या नात्याचा पुढचा पदर आपल्यासमोर उलगडला...जरा ''लगान'मधलं राधा कैसे न जले हे सुंदर गाणं आठवा.... 

मन मै है राधे को कान्हा जो बसाये....
तो कान्हा काहे को उसे न बताए...
प्रेम की अपनी अलग बोली अलग भासा है...
बात नैनो से हो कान्हा की यही आसा है...

                    खरोखर डोळ्यांनी आणि स्पर्शाने अनुभवलेलं जरी हे नातं असलं तरी त्यात नक्कीच कुठेतरी एक दैवी अंश आहे..जो या नात्याला त्याचं एक वेगळेपणा..उदात्तपणा मिळवून देतो...एक असं वेगळेपण की ज्यामुळे त्यांच्या नात्याचा अगदी अपेक्षित शेवट न होता...ते आपल्या डोळयांच्या कडा पाणावतं...पण त्यात विरहाचं दुःख असण्यापेक्षा तृप्तीची एक उदात्त अनुभुती आहे...

                   आणि यात सगळ्यात पुन्हा कान्हा आणि राधा यांचं संगीताशी किंवा खरंतर कृष्णाच्या वेणुशी अर्थात बासरीशी असलेलं असोसिएशन...संगीत ही एक अशी शक्ती आहे की ती सगळ्या भवतालांना छेद देऊन आपल्या अस्तित्वाने सगळा आसमंत भरुन टाकते...फार प्रकर्षाने त्याच्या अस्तित्वाची जाणीव न करुन देता ते आहे याची जाणीव करुन देणारी भावना....युद्धभूमीवर लढायला निघालेल्या आपल्या लाडक्या कृष्णाला निरोप देताना राधेला हवे असतात ते त्याच्या वेणुचे सूर..अर्थात सुरांमधून जाणवणारं त्याचं अस्तित्व जे तिला प्रहर, काळ, परिस्थिती किंवा इतर कुठलीही गोष्ट सोडून थेट तिच्या काळजाला भेदू शकतात..तिला कडकडून भेटू शकतात...त्या सुरांच्या प्रत्येक कणाकणातून तिला तिच्या कन्हैयाच्या अस्तित्वाची जाणीव करुन देऊ शकतात...बसं अजून काय हवं...अशा प्रेमाला किंवा नात्याला कुठल्याही भौतिक गोष्टींची गरज लागत नाही...

                    असं एखादं तरी नातं आयुष्यात आपणं जपावं किंवा आपल्याला जमावं अशी इच्छा आहे...पण त्यासाठी एक कदंबाचं वृक्षंही हवं ज्याखाली बसून आपण अशा नात्याची ऊब अनुभवू शकतो....अर्थात मला वाटतं इथेही कदंबाचं वृक्ष ही देखील केवळ एक सांकेतिक गोष्ट आहे...नाहीतर बकाल, माणसांनी गजबजलेल्या आपल्या शहरांमध्ये...भवतालामध्ये असं कदबांचं वृक्ष कुठे मिळणार...?

                      तुमच्या मनाची आणि तुमच्या अंतरिक उर्मींची अशी एक मैफल जमली पाहिजे की ज्यासाठी व्यासपीठ म्हणून तुम्ही कदबांच्या झाडाखालच्या त्या छायेचा वापर केला पाहिजे....कदंबाच्या या झाडाखाली तुम्हाला शीतल छाया नक्की मिळेल..मग ते तुम्हाला वरळी सी फेसला मिळो किंवा अगदी तुमच्या घरच्या गॅलरीत...कारण दिसायला त्यात विरहाचा दाह आहे...पण तरीही तो शमवण्याची पूर्ण ताकद असलेला तृप्तीचा एक विलक्षण गारवा आहे...ज्याची एक झुळूक देखील हा दाह क्षणात कमी करु शकते...

                        स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाच्या त्या थंडगार ऑडिटोरियममध्ये मी ती झुळूक अनुभवली असं म्हणून मी उगाच लहान तोंडी मोठा घास घेणार नाही...कारण ती झुळूक निश्चितपणे तिथल्या चील्ड ए.सीची असणार..पण तरीही अशी एखादी झुळुक असते...या गोष्टीवर माझा विश्वास मात्र नक्की बसला...त्यासाठी आता खरोखर अनुभवाचं अनुभूतीत रुपांतर कधी होतंय...आणि त्या झुळुकेचा तो दैवी स्पर्श केव्हा अंग मोहरवुन टाकतोय...याचीच वाट पाहतोय...पण त्यासाठी तिथपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे...मनाची...विचारांची तशी बैठक बांधली जाणं गरजेचं आहे....

                पण ती बसू शकेल..नक्की..त्यासाठी एकदा तरी या कदंबाच्या झाडाखाली बसून कृष्णाच्या मुरलीच्या बॅकग्राऊंड म्युझिकबरोबर ते क्षण अनुभवणं गरजेचं आहे...माझा शोध सुरुच राहिलं...पण तुम्हीही जरा प्रयत्न करा....तुम्हालाही नक्की मिळेल...तुमचं कदंबाचं वृक्ष....

                   स्वानंद कुलकर्णी
                     १५.०२.२०१२

Monday, 16 May 2011

अमृततुल्यातील वैचारिक अमृतमंथन...



अमृततुल्यातील वैचारिक अमृतमंथन


कोंदटलेल्या आणि गजबजलेल्या अमृततुल्यमध्ये (म्हणजे इतरांसाठी हे फक्त एक अमृततुल्य का असेना त्याच्यासाठी हे फाईव्ह स्टार हॉटेलपेक्षा कमी नव्हतं..कारण मुळात त्याची लायकीच ती होती...एक कटिंग आणि शेंगदाणा लाडू एवढ्यासाठी त्याला खास पंख्याखालची जागा मिळायची..रोज..म्हणजे फारंच झालं ना...)..तर अशा ठिकाणी तो अर्थात सुन्या बसला होता...हातात सिगरेट आणि समोर कटिंग..एक अद्वितीय कॉम्बिनेशन...या दोघांच्या संयोगातून थेट जिहादी किंवा मोक्षप्राप्तीचे विचार येऊ शकतात...म्हणा दोन्हीही विचार एकाच ठिकाणी घेऊन जाणारे..असो...या संयुगाने आपली किमया साधली होती आणि सुन्या झुरक्यावर झुरके आणि घोटावर घोट घेत निपचीत पडला होता...तेवढ्यात ए भाड्या.....(इति पश्या आणि जित्या)....यांच्या लायकीवर आणणाऱ्या हाकेनं त्याची समाधी भंगली किंवा ब्रह्मानंदी लागलेली टाळी भंगली आणि एका मोठ्या धुराच्या लोटाबरोबर तो बोलता झाला. ...जगदंब...जगदंब...
(लगेच पश्या आणि जित्या)...आमेन.....

तेव्हा या कट्टयावरच्या या संवादांच्या नांदीमुळे विषय जरा वेगळाच असणार अशी कल्पना आली. ..विषयाला खानेसुमारी झाली...


पश्या- काय रे काय झालं? (जित्याकडे एक कम्प्लिट....काय चु...आहे असा लूक टाकत)....

सुन्या- चिता करतो...सृष्टीची

जित्या- तुला विश्वाची म्हणायचंय का?

सुन्या- नाही रे समर्था..सृष्टीचीच...सृष्टीचीच

जित्या- ए...उगाच नाथा कामत बनू नकोस...(व्वा..काय पण रेफरन्स)

सुन्या- अरे चिंता करतो...मराठी चित्रपट सृष्टीची

जित्या, पश्या- कशाला?..बरं...कट्टयावर का नव्हतास काल?..कुठे गेला होतास...$^#$#^^$#&#

सुन्या- अरे बालगंधर्व पाहिला...

पश्या- मग तुला काय चिंता पडलीये...? प्रोमो तर कसले भारी बनवले आहेत...प्रीमिअरपण एकदम भव्य दिव्य..काय ते सेट..काय ते ग्रँजर....

जित्या- ग्रँजर.....(जित्या हा कधीच कुठल्या गटातला नसतो....पश्याबरोबर आला म्हणजे तो काही पश्याच्या
गटातला..हा तुमचा तद्दन गैरसमज आहे..पश्याचा जीडी असला तरी)

जित्या- ए सुन्या हा बघ..ग्रँजर म्हणतोय....दक्षिणमुखी मारुतीच्या याच्या घराच्या गच्चीतून शनिवार वाडाही दिसत नाही आणि ग्रँजरच्या गफ्फा मारतोय हा...

पश्या- अरे हो रे सोन्या...तुझा आजकाल अँटिलियातच मुक्काम असतो नाही का विसरलोच मी...च्यायला...



जित्या- ए.....मुकेश साहेबांना काही बोलायचं नाही हा...पगारात हाईक न घेताही साहेब कसे टेचात राहतायत..महिन्याची सॅलरी फक्त

१५ कोटी रुपये..याला म्हणतात ग्रॅजर...कळलं...

सुन्या- अरे पण ते नुसतं असून उपयोग नाही...मग बालगंधर्व होतो...सगळं काही भव्य दिव्य..छान..अप्रतिम...पणcontent चं काय...

पश्या- सगळं समजलं...जराexplain करशील.....

सुन्या- अरे...मोठ्या अपेक्षेनं बालगंधर्व पाहायला गेलो..फिल्म आहे भव्यदिव्य...डोळे विस्फारतात...पण मन नाही भरत...सुबोध दिसलायही छान..कामही उत्तम केलंय..पण फिल्म मनाचा ठाव घेत नाही.

जित्या- हा तर असं म्हणतोय की जसं काय एफ.एम वरती रेहमान सारखी यानी गंधर्वांची गाणी ऐकलीत...

सुन्या- ओ..तुम्ही बोलूच नका...'संगीत संशयकल्लोळ'च्या भांडवलावर हे टोमणे मारणं तुम्हाला सुचत नाही....च्यायला निपण्या आणि अम्याचं नाटक म्हणून पाहायला गेला...पण मी ऐकलंय..चांगलंय रे....

जित्या- म्हणजे काय चांगलंच आहे रे....पदं तर काय बाप

सुन्या- हं म्हणजे काय...content ना...तेच तर म्हणतोय..तेच तर शोधायचा प्रयत्न करतोय..हे म्हणजे ना ब्लॅक सारखं झालं...सेट...लाईट्स...सिनेमॅटोग्राफी..थरथरणारा बच्चन...बिथरणारी आएशा कपूर...राणी मुखर्जी...
पण 'मिरॅकल वर्कर' सारखं मिरॅकल नाही.....

जित्या- म्हणजे काय?... रवी जाधव म्हणजे मराठीतला संजय लीला....?

सुन्या- नाही रे घंटू...

पश्या- मग काय..? आशुतोष गोवारीकर?

सुन्या- अरे हा नाही म्हणून तो नाही...मान्य तो वेगळा आहे..पण सालं इतकं सगळं भव्य दिव्य असताना..सबस्टॅनशिअल हाताला काहीच लागू नये...आणि रिएक्शनकाय...भन्नाट...अप्रतिम...
आऊट ऑफ धिस वर्ल्ड...मान्य असतात प्रत्येकाची मतं...पण मग तुलना करु नका ना...फिल्म पाहायची मनोरंजनाच्या अपेक्षेनं..आणि मग व्वा.व्वा..म्हणायचं...श्या...

जित्या- व्वा...अरे entertainment industry अर्थात बॉलिवूड....किंवा कुठलीही फिल्म इंडस्ट्री...entertain करणं हा शुद्ध आणि निखळ हेतू...i am here to entertain..तुझ्या किंग खानचं वाक्य ना..
तुझा आवडता

सुन्या- अरे हो..पण तो चुत्या नाही बनवत...प्युअर एन्टरटेनमेंट म्हणजे प्युअर एन्टरटेनमेंट...अरे 'बालगंधर्व'कडून लोकांना वेगळ्या अपेक्षा आहेत...गाडगीळांचे दागिने...नेत्रदिपक सेट...
सुंदर दिसणारा सुबोध.हे कोंदण आहे...पण हिरा बालगंधर्व
आहेत ना...त्याच काय...ते कुठे चकाकतायत....नुसतं कोंदण लखाखून काय उपयोग...'दबंग'च्या नजरेतून गंधर्वांना पाहून उपयोग नाही ना...त्याचं गाण..त्याचं दिसणं...त्याचं वागणं...आणखी जास्त मिळून यायला पाहिजे होतं..


सुन्या- मी पण पु.ल देशपांड्यांच्या लेखातून किंवा शैलाकाकुंच्या 'देवंगंधर्वा'तून गंधर्वांना समजण्याचा प्रयत्न केला...मी बिनडोक आहेच...पण सगळे नाही ना...

जित्या- जाऊ दे ना यार...दम मार.....

सुन्या- मुळात ना सालं...ग्रँजर म्हणून हे चुत्या बनवायला बघतात..ओसामाचंच घे ना...काय ग्रँजरनी त्याला मारलंय...
नेव्ही सील्स...तो अबोटाबादचा बंगला...ते समुद्रात त्याला
दफन करणं...ते फेसबूकवरचे ओसामाचे फोटो...मान्य ओसामा खूप मोठा माणूस..पण किती उद्दातीकरणं त्या operation geronimo चं ओबामाही सांगतात..operation geronimo was
the longest 40 mins of my life. पण अजूनही अनेकांना असं वाटतंय...की तो जिवंत आहे...म्हणजे मुळात बातमीत कन्टेन्ट नाही....नुसतंच ग्रँजर....

पश्या- ओ पत्रकार...ए जित्या हा पक्का भैसटलाय...ओसामा आणि बालगंधर्व...आनंद मिळाला रे..ओसामा मेल्यानी आणि बालगंधर्वांवर इतकी भव्य फिल्म निघाल्याचा....

सुन्या- ए पश्या..जाऊ दे..मुळात तुझी उंचीच कमी आहे...तुला नाही कळणार....

जित्या- ए..ते ग्रँजर आणि तो ओसामा गेला...^$&@#%#&@%...
चला काही तरी करुयात....

(सुन्याचा मोबाईल वाजतो...ढिंक चिका...ढिंक चिका....ढिंक..चिका..ए...ए...ए...)

सुन्या- निखळ मनोरंजन....कळलं....सोडा....हां..बोल रे....हां..चल येतो...चला रे....अरे..परवा कुणी तरी बालगंधर्वांची नांदी म्हणत होतं...च्यायला शब्द माहिती नाही...जाणून घेण्याची कळकळ नाही....उगाच...शो बाजी....

जित्या- झाल्या तोंडाच्या वाफा दवडून...स्वतः काही करणार नाही...नुसत्या गप्पा....

सुन्या- ए.....

पश्या- जाऊ द्या...समीक्षक...चला कटू या...

सुन्या- मालक...खात्यावरर जमा करा....तीन शेंगदाणा लाडू...चार गोल्डफ्लेक...सहा कटिंग...जित्या...चर्चा बाकी मस्त रंगली हा......


Sunday, 15 May 2011

काका मैं...काका बन गया.....


एखादा दिवस..तुमच्या नकळत...कुठलीही चाहूल न देता...जेव्हा तुमच्या आयुष्यातला एकदम आनंदाचा दिवस बनून जातो...तेव्हा काय होतं...हे अनुभवानेच सांगता येईल....आज मी खूप आनंदी आहे...या फिलिंगला फेसबूक सारख्या सोशल नेटवर्किंग साईट्सवर क्षणात अनेक लाईक्स मिळतील किंवा...आनंदाचं नेमकं कारण काय...अशी विचारणा करणाऱ्या कमेंट्स मिळतील....अशा वेळी आपण आनंदी आहोत...व्वा...छान...(असे दिवस सहसा येत नाहीत..हे सोडून...)हे फिलिंग इमॅजिन करुन लोकांनी हा रिस्पॉन्स दिलेला असतो...काही वेळा अगदी ट्रेन वेळवर मिळण्यापासून ते सॉक्स लवकर सापडण्यासारख्या फालतू गोष्टींसाठीही हा आनंद असू शकतो...सोशल नेटवर्किंग साईट्सवर असल्या तद्दन भंपक गोष्टींचाच तर आनंद सोहळा आपण साजरा करत असतो...पण काही आनंद असे असतात...की जे खरोखर लोकांना सांगण्याबरोबर आपल्यालाही मनापासून आनंद देऊन जातात...असाच एक आनंद मी अनुभवला..अर्थात आता हा आनंद मला अपेक्षित नव्हता किंवा...त्याची अनुभुती होईल तेव्हा नेमकं काय होईल याचा विचारही मला आला नव्हता असं म्हणणार नाही...कारण गेले नऊ महिने..आमचं सारं कुटुंब याच एका आनंदासाठी आसुसलेलं होतं....आमच्या घरात एक नवा पाहूणा येणार होता...

याचसाठी केला होता अट्टाहास..शेवटचा दिस गोड व्हावा.....

        १४ मे...वेळ..रामराणा जन्मला ती टळटळीत दुपारची....मुंबई आणि आसपासच्या परिसरात दूपार ही केवळ कंटाळवाणी असते...त्यामुळे मनात आणि भावनांमध्ये चिडचिडीशिवाय काहीही निर्माण होऊच शकत नाही....अशावेळी थंडगार वाऱ्य़ाची एक खास झुळूक जर निर्मात्यानं आपल्यासाठी पाठवली तर कसं अंग शहारुन येईल..तसं अगदी या बातमीनं झालं....(पत्रकारितेच्या क्षेत्रात असल्यानं या शब्दापासून या जन्मी तरी सुटका होणं दिसत नाही...)

            माझी वहिनी कम बहिण...शीतल..टिटू...हिला प्रसववेदना सुरु झाल्या....आपल्या मेलोड्रॅमॅटिक आयुष्यात आपण इमेजवर इतके जगत असतो...की सारं काही त्यानुसार व्हावं असं आपल्याला वाटत असतं...आदल्या दिवशी ऑफिसमधून घरी गेल्यानंतर वहिनीला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्याचं काकांनी मला सांगितलं....त्यानंतर त्या दुपार पर्यंत दिवस कसा गेला...कळलंच नाही....दुपारी शीतलला पाहून काहीतरी वेगळंच वाटतं होतं...वहिनी आहे म्हणून नाही म्हणत..पण ती बेडवर शांतपणे झोपली आहे...असं एक दुर्मिळ चित्र काहीसं अस्वस्थ करत होतं...पण तिच्या चेहऱ्यावरचं मंद हसू...कुठेतरी मनाला सुखावत होतं....तर वर म्हटल्याप्रमाणे सिनेमॅटिक मोमेंटची मनात उजळणी करुन बाळाचा पहिला ट्यँहा..ट्यँहा...ऐकायला आमची समस्त फॅमिली...उपस्थित असेल...असं चित्र मी मनात रंगवून घेतलं....असं काही घडत नाही हे नंतर माझ्या लक्षात आलं....पण आम्ही बाहेर जेवायला आलेलो असताना....काकांना मावशीचा फोन आला....क्षणभर शांतता....तोंडातला घास...तोंडात...काकांचा....एकच उद्गार...मी आजोबा झालोय...पोरगा झाला....बापरे....पर्सी (बाळाचा बाप....आईशप्पथ....इतका मोठा झालाय माझा भाऊ)....आणि मी...काका....हॉटेलात काका ओरडले आणि आनंदाला पारावार न उरणे याच्या पलीकडचं काहीतरी झालं....


                 डिलक्स रुममध्ये तो शांतपणे पहुडला होता....गेले नऊ महिने आम्हा सर्वांचे डोळे त्याला पाहण्यासाठी आतुरले होते...पण अर्थात त्याला काय कल्पना...तो आपला शांत पडला होता....कपाळावर आठ्या का होत्या कुणास ठाऊक...पण काही मिनिटांपूर्वी जन्माला आलेला तो ईश्वराचा अंश बघताना उपस्थितांच्या डोळ्याच्या बोअरवेल नकळतपणे सुरु झाल्या होत्या....अनुभवणे..या शब्दाचा वापर आपण फार सपक पद्धतीने करतो...अनुभव ही काय चीझ आहे...हे मी समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो....मीठी....आनंदोद्गार....डोळ्यातले अश्रू या सगळ्या गोष्टी त्याला पुरक अशा होत्या...पण अनुभव...अवर्णनीय....

    गेल्या नऊ महिन्यांच्या कॅलेंडरची पान निमिषार्धात माझ्या डोळ्यासमोरुन झरझर उलटली....पुत्रजन्मसोहळ्याच्या रंगीत तालमीत आम्ही सगळे सहभागी होतो....अर्थात ज्येष्ठांसाठी...किंवा हे खऱ्या अर्थानं अनुभवलेल्यांसाठी हे क्षण फारसे महत्त्वाचे नसतीलही...पण माझ्यासाठी मात्र निश्चित होते..कारण एक तर ही माझी प्रेमाची माणसं आहेत ही...आणि दुसरं म्हणजे माझं लग्न ही पार दूरवरची बाब असल्यानं.....अनुभव गाठीशी असायला काही हरकत नाही असंही वाटतं...माझी गुणाची वहिनी...एक एक दिवस...याला साधनाच म्हणायला हवी....कारण तिच्यासारख्या कामाला जुंपून घेतलेल्या बाईला...शांतपणा...नावालाच मिळतत होता...घरातल्यांनी कामचं वाटप करुन घेतलं होतं...यात माझं कॉन्ट्रिब्यूशन किती..हे मला चांगलं ओळखणाऱ्या माणसांना कळलं असेलच.....असो...शीतलचं काहीतरी आपलं आपलं चालू असायचं...कामं करुन झाली की ती काही बाही वाचत बसायची...मला अशावेळी तिच्या मनात किंवा तिच्या पोटात नेमकं काय चालू असेल याची उत्सुकता असायची...कारण...सुभद्रेच्या पोटात राहून अभिमन्यूनं अख्खं चक्रव्यूह भेदाची रेसिपी शिकली...पण माझी वहिनी सुगरण आणि आम्ही सारे खवय्येच्या रेसिपीची दिवानी..आणि अर्थात चक्रव्यूह शिकण्याइतका साधा सोपा काळ राहिला तरी आहे कुठे..बाहेरच्या जगात काय चाललंय...आणि काय करावं लागतं...यापासून या चिमुकल्या जीवांना किती काळ दूर लोटता येईल याचा विचार खरंतर व्हायला हवा...पण तिच्या या सगळ्या साधनेला आणि तिच्या धार्मिक वृत्तीला (खरोखर वाखाणण्याजोगा गूण)...यश मिळालं ते १४ तारखेला.....


                      त्याला पाहताना....आनंदाचे डोही आनंद तरंग अशी काहीतरी भावना होती....रडणारी माणसं मला अजिबात आवडत नाहीत...पण त्याचं ते ठसक्यात टिपेच्या आवाजातलं रडणं ऐकून काय आनंद झालाय मला....सांगताच येणार नाही....इतकं सुंदर..इतकं निष्पाप..इतकं निरागस..आणि अर्थातच इतकं कोमल....यापूर्वी मी काहीही पाहिल्याचं मला आठवत नाही.......इवलेसे पाय...इवलेसे डोळे..इवलेसे हात....इतकुशी जिवणी...ही सगळी एक्स्प्रेशन द्यावी लागतायत...कारण याच्या पलीकडे कुणी कधी गेलंच नाहीए...साधारण २२ तासांचा झाला होता तो....त्यानी मला याआधी डोळे उघडून पाहिलंही नव्हतं...पण २२ तासांनतर मला त्याचा स्पर्श झाला....याच हॉस्पिटलमध्ये मी त्याच्या हृदयाचे ठोके ऐकले होते...अचानक महाजन डॉक्टरांकडे कुठल्यातरी...मला वाटतं डॉप्लर टेस्टच्या वेळी मी...गर्भस्वरुपात असलेल्या या पिल्लाचे पाय आणि मणका पाहिला होता...पहिल्यांदा हे सारं काही अनुभवलेलं होतं...आणि तोच पवित्र जीव...त्याचा पहिला स्पर्श..मला शब्द नाही सुचत.....आत्मा आणि ईश्वर अशी आई या शब्दाची फोड होते...मदर्स डेच्या पलीकडे आपल्याला त्याची फारशी जाणीव होत नाही....हे मान्य केलंच पाहीजे.....अशा या आईच्या पोटात नऊ महिन्यांनी स्वरुपात आलेला तो लिटील एंजल माझ्या मांडीत होता....बापरे....काय सांगावं साहेबा...माझे मोठ्ठे मोठ्ठे हात....ती अजस्त्र मांडी यात तो.....आकाशात अलगद उडणाऱ्या  पीसाइतका हलका वाटत होता...अंगावर काटा येतोय आत्ताही हे लिहीताना....डोळे भरुन का येऊ नयेत...

                    या माझ्या छोट्या मित्रानं त्याच्या आगमनानं आमची छोटी छोटी आयुष्य अक्षरशः प्रकाशमान करुन टाकली आहेत...आत्ता सांगतो...असं न सांगता येणारा..मन भरुन टाकणारा..एक आनंद आमच्या मिडिऑकर आयुष्यात भरुन टाकलाय.....हा देवदूत आनंदाची एक चिरंतन काळ टिकणारी अनुभुती घेऊन आमच्यासाठी आला आहे...त्यातून किती घेऊ आणि किती नाही असं आम्हाला झालंय...त्या किलकिल्या डोळ्यांतून तो आम्हाला आत्ता पाहतोय...आमचे आवाज तो नक्की ऐकतोय....

               मित्रा..आमच्या या छोटयाश्या आयुष्याला आनंदाचं एक कोंदण दिलयंस तु...तुझं मनःपूर्वक स्वागत......तुम जो आए जिंदगी मैं बात बन गयी....यशवंत हो...गुणवंत हो....तुझ्या दीर्घायुष्यासाठी...तुझ्या सुयशासाठी ईश्वरचरणी...कोटीच्या कोटी....प्रणाम...वेलकम होम..माय फ्रेंड....

                 यस....मै काका बन गया........


Tuesday, 10 May 2011

नका सोडून जाऊ रंगमहाल....


(ऐरणीच्या देवा) गाण्याचा अँबियन्स.....
जयश्री गडकरांचा साधा अभिनय... आनंदघन म्हणजेच लताबाईंचं निखळ साधं संगीत... आणि या सगळ्या बरोबर साधी माणसं मधलं हे गाणं यादगार बनवलं ते गीतकार जगदीश खेबुडकरांच्या साध्या परंतू लक्षात राहिलेल्या शब्दांमुळे... ज्येष्ठ गीतकार जगदिश खेबुडकरांनी अर्थात नानांनी याच साधेपणाने या जगाचा निरोप घेतला...१० मे १९३२ साली हळदी या गावी जगदीश खेबुडकरांचा जन्म झाला.. पण त्यांचं मूळ गाव करवीर तालुक्यातलं खेबवडे....खेबुडकरांचे वडील शिक्षक मात्र त्यांचं मन विद्यार्थ्यांइतकंच रमायचं ते संगीतात...वडलांच्या भजनी मंडळाचा आणि लोकसंगीताचा खेबुडकरांच्या मनावर परिणाम झाला.. पण या साध्या माणसाच्या गीतलेखनाची सुरुवात मात्र तितकीशी साधी झाली नाही....१९४८ साली गांधीजींची हत्या झाल्यानंतर उसळलेल्या आगडोंबात खेबुडकरांचं घरंही आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं....आणि इथेच खेबुडकरांनी पहिली कविता लिहिली.."मानवते तु विधवा झाली"...यानंतर त्यांनीही शिक्षकी पेशा स्वीकारला...१९६० साल मात्र त्यांच्यासाठी महत्त्वाचं ठरलं कारण मला म्हणतात लवंगी मिरची...या त्यांच्या गाण्यानं धमाल उडवली....आणि इथूनच त्यांचा प्रवास सुरु झाला...आणि कथा, पटकथा, संवाद, नाट्यलेखन अशी सर्वांगानं त्यांची प्रतिभा सातत्याने बहरत राहिली. तब्बल 3500 कविता, 2500 चित्रपटगीतं, 25 कथा-पटकथा-संवाद, 50 लघुकथा, पाच नाटकं आणि चार मालिका असा त्यांच्या कर्तृत्वाचा आलेख आहे. आणि म्हणूनच त्यांना ग.दि माडगुळकरांचा वारसदार म्हणून संबोधलं जातं...चित्रपटांच्या झगमगाटात खेबुडकर त्यांच्या गीतांनी तेवत राहिले ते मंद प्रकाश ज्योतीप्रमाणे...देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा...अष्टविनायका तुझा महिमा कसा यासारखी देवाची आळवणी करणारी गीतं असो किंवा शुभंकरोती म्हणा सारखं लहानग्यांसाठीचं गाणं असो...खेबुडकरांनी भावगीत-भक्तिगीतांपासून, प्रेमगीत-मस्तीभऱ्या शृंगारगीतांपर्यंत गीतलेखनाचे सर्व प्रकार उत्तम प्रकारे हाताळले....अशा या प्रतिभावान गीतकाराला त्यांचे चाहते नका सोडून जाऊ रंगमहाल असं म्हणत असतानाच खेबूडकरांनी या भौतिक जगाचा पिंजरा तोडून आकाशी झेप घेतली....
नाना मज तुझी आठवण येते.....