Sunday, 15 May 2011

काका मैं...काका बन गया.....


एखादा दिवस..तुमच्या नकळत...कुठलीही चाहूल न देता...जेव्हा तुमच्या आयुष्यातला एकदम आनंदाचा दिवस बनून जातो...तेव्हा काय होतं...हे अनुभवानेच सांगता येईल....आज मी खूप आनंदी आहे...या फिलिंगला फेसबूक सारख्या सोशल नेटवर्किंग साईट्सवर क्षणात अनेक लाईक्स मिळतील किंवा...आनंदाचं नेमकं कारण काय...अशी विचारणा करणाऱ्या कमेंट्स मिळतील....अशा वेळी आपण आनंदी आहोत...व्वा...छान...(असे दिवस सहसा येत नाहीत..हे सोडून...)हे फिलिंग इमॅजिन करुन लोकांनी हा रिस्पॉन्स दिलेला असतो...काही वेळा अगदी ट्रेन वेळवर मिळण्यापासून ते सॉक्स लवकर सापडण्यासारख्या फालतू गोष्टींसाठीही हा आनंद असू शकतो...सोशल नेटवर्किंग साईट्सवर असल्या तद्दन भंपक गोष्टींचाच तर आनंद सोहळा आपण साजरा करत असतो...पण काही आनंद असे असतात...की जे खरोखर लोकांना सांगण्याबरोबर आपल्यालाही मनापासून आनंद देऊन जातात...असाच एक आनंद मी अनुभवला..अर्थात आता हा आनंद मला अपेक्षित नव्हता किंवा...त्याची अनुभुती होईल तेव्हा नेमकं काय होईल याचा विचारही मला आला नव्हता असं म्हणणार नाही...कारण गेले नऊ महिने..आमचं सारं कुटुंब याच एका आनंदासाठी आसुसलेलं होतं....आमच्या घरात एक नवा पाहूणा येणार होता...

याचसाठी केला होता अट्टाहास..शेवटचा दिस गोड व्हावा.....

        १४ मे...वेळ..रामराणा जन्मला ती टळटळीत दुपारची....मुंबई आणि आसपासच्या परिसरात दूपार ही केवळ कंटाळवाणी असते...त्यामुळे मनात आणि भावनांमध्ये चिडचिडीशिवाय काहीही निर्माण होऊच शकत नाही....अशावेळी थंडगार वाऱ्य़ाची एक खास झुळूक जर निर्मात्यानं आपल्यासाठी पाठवली तर कसं अंग शहारुन येईल..तसं अगदी या बातमीनं झालं....(पत्रकारितेच्या क्षेत्रात असल्यानं या शब्दापासून या जन्मी तरी सुटका होणं दिसत नाही...)

            माझी वहिनी कम बहिण...शीतल..टिटू...हिला प्रसववेदना सुरु झाल्या....आपल्या मेलोड्रॅमॅटिक आयुष्यात आपण इमेजवर इतके जगत असतो...की सारं काही त्यानुसार व्हावं असं आपल्याला वाटत असतं...आदल्या दिवशी ऑफिसमधून घरी गेल्यानंतर वहिनीला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्याचं काकांनी मला सांगितलं....त्यानंतर त्या दुपार पर्यंत दिवस कसा गेला...कळलंच नाही....दुपारी शीतलला पाहून काहीतरी वेगळंच वाटतं होतं...वहिनी आहे म्हणून नाही म्हणत..पण ती बेडवर शांतपणे झोपली आहे...असं एक दुर्मिळ चित्र काहीसं अस्वस्थ करत होतं...पण तिच्या चेहऱ्यावरचं मंद हसू...कुठेतरी मनाला सुखावत होतं....तर वर म्हटल्याप्रमाणे सिनेमॅटिक मोमेंटची मनात उजळणी करुन बाळाचा पहिला ट्यँहा..ट्यँहा...ऐकायला आमची समस्त फॅमिली...उपस्थित असेल...असं चित्र मी मनात रंगवून घेतलं....असं काही घडत नाही हे नंतर माझ्या लक्षात आलं....पण आम्ही बाहेर जेवायला आलेलो असताना....काकांना मावशीचा फोन आला....क्षणभर शांतता....तोंडातला घास...तोंडात...काकांचा....एकच उद्गार...मी आजोबा झालोय...पोरगा झाला....बापरे....पर्सी (बाळाचा बाप....आईशप्पथ....इतका मोठा झालाय माझा भाऊ)....आणि मी...काका....हॉटेलात काका ओरडले आणि आनंदाला पारावार न उरणे याच्या पलीकडचं काहीतरी झालं....


                 डिलक्स रुममध्ये तो शांतपणे पहुडला होता....गेले नऊ महिने आम्हा सर्वांचे डोळे त्याला पाहण्यासाठी आतुरले होते...पण अर्थात त्याला काय कल्पना...तो आपला शांत पडला होता....कपाळावर आठ्या का होत्या कुणास ठाऊक...पण काही मिनिटांपूर्वी जन्माला आलेला तो ईश्वराचा अंश बघताना उपस्थितांच्या डोळ्याच्या बोअरवेल नकळतपणे सुरु झाल्या होत्या....अनुभवणे..या शब्दाचा वापर आपण फार सपक पद्धतीने करतो...अनुभव ही काय चीझ आहे...हे मी समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो....मीठी....आनंदोद्गार....डोळ्यातले अश्रू या सगळ्या गोष्टी त्याला पुरक अशा होत्या...पण अनुभव...अवर्णनीय....

    गेल्या नऊ महिन्यांच्या कॅलेंडरची पान निमिषार्धात माझ्या डोळ्यासमोरुन झरझर उलटली....पुत्रजन्मसोहळ्याच्या रंगीत तालमीत आम्ही सगळे सहभागी होतो....अर्थात ज्येष्ठांसाठी...किंवा हे खऱ्या अर्थानं अनुभवलेल्यांसाठी हे क्षण फारसे महत्त्वाचे नसतीलही...पण माझ्यासाठी मात्र निश्चित होते..कारण एक तर ही माझी प्रेमाची माणसं आहेत ही...आणि दुसरं म्हणजे माझं लग्न ही पार दूरवरची बाब असल्यानं.....अनुभव गाठीशी असायला काही हरकत नाही असंही वाटतं...माझी गुणाची वहिनी...एक एक दिवस...याला साधनाच म्हणायला हवी....कारण तिच्यासारख्या कामाला जुंपून घेतलेल्या बाईला...शांतपणा...नावालाच मिळतत होता...घरातल्यांनी कामचं वाटप करुन घेतलं होतं...यात माझं कॉन्ट्रिब्यूशन किती..हे मला चांगलं ओळखणाऱ्या माणसांना कळलं असेलच.....असो...शीतलचं काहीतरी आपलं आपलं चालू असायचं...कामं करुन झाली की ती काही बाही वाचत बसायची...मला अशावेळी तिच्या मनात किंवा तिच्या पोटात नेमकं काय चालू असेल याची उत्सुकता असायची...कारण...सुभद्रेच्या पोटात राहून अभिमन्यूनं अख्खं चक्रव्यूह भेदाची रेसिपी शिकली...पण माझी वहिनी सुगरण आणि आम्ही सारे खवय्येच्या रेसिपीची दिवानी..आणि अर्थात चक्रव्यूह शिकण्याइतका साधा सोपा काळ राहिला तरी आहे कुठे..बाहेरच्या जगात काय चाललंय...आणि काय करावं लागतं...यापासून या चिमुकल्या जीवांना किती काळ दूर लोटता येईल याचा विचार खरंतर व्हायला हवा...पण तिच्या या सगळ्या साधनेला आणि तिच्या धार्मिक वृत्तीला (खरोखर वाखाणण्याजोगा गूण)...यश मिळालं ते १४ तारखेला.....


                      त्याला पाहताना....आनंदाचे डोही आनंद तरंग अशी काहीतरी भावना होती....रडणारी माणसं मला अजिबात आवडत नाहीत...पण त्याचं ते ठसक्यात टिपेच्या आवाजातलं रडणं ऐकून काय आनंद झालाय मला....सांगताच येणार नाही....इतकं सुंदर..इतकं निष्पाप..इतकं निरागस..आणि अर्थातच इतकं कोमल....यापूर्वी मी काहीही पाहिल्याचं मला आठवत नाही.......इवलेसे पाय...इवलेसे डोळे..इवलेसे हात....इतकुशी जिवणी...ही सगळी एक्स्प्रेशन द्यावी लागतायत...कारण याच्या पलीकडे कुणी कधी गेलंच नाहीए...साधारण २२ तासांचा झाला होता तो....त्यानी मला याआधी डोळे उघडून पाहिलंही नव्हतं...पण २२ तासांनतर मला त्याचा स्पर्श झाला....याच हॉस्पिटलमध्ये मी त्याच्या हृदयाचे ठोके ऐकले होते...अचानक महाजन डॉक्टरांकडे कुठल्यातरी...मला वाटतं डॉप्लर टेस्टच्या वेळी मी...गर्भस्वरुपात असलेल्या या पिल्लाचे पाय आणि मणका पाहिला होता...पहिल्यांदा हे सारं काही अनुभवलेलं होतं...आणि तोच पवित्र जीव...त्याचा पहिला स्पर्श..मला शब्द नाही सुचत.....आत्मा आणि ईश्वर अशी आई या शब्दाची फोड होते...मदर्स डेच्या पलीकडे आपल्याला त्याची फारशी जाणीव होत नाही....हे मान्य केलंच पाहीजे.....अशा या आईच्या पोटात नऊ महिन्यांनी स्वरुपात आलेला तो लिटील एंजल माझ्या मांडीत होता....बापरे....काय सांगावं साहेबा...माझे मोठ्ठे मोठ्ठे हात....ती अजस्त्र मांडी यात तो.....आकाशात अलगद उडणाऱ्या  पीसाइतका हलका वाटत होता...अंगावर काटा येतोय आत्ताही हे लिहीताना....डोळे भरुन का येऊ नयेत...

                    या माझ्या छोट्या मित्रानं त्याच्या आगमनानं आमची छोटी छोटी आयुष्य अक्षरशः प्रकाशमान करुन टाकली आहेत...आत्ता सांगतो...असं न सांगता येणारा..मन भरुन टाकणारा..एक आनंद आमच्या मिडिऑकर आयुष्यात भरुन टाकलाय.....हा देवदूत आनंदाची एक चिरंतन काळ टिकणारी अनुभुती घेऊन आमच्यासाठी आला आहे...त्यातून किती घेऊ आणि किती नाही असं आम्हाला झालंय...त्या किलकिल्या डोळ्यांतून तो आम्हाला आत्ता पाहतोय...आमचे आवाज तो नक्की ऐकतोय....

               मित्रा..आमच्या या छोटयाश्या आयुष्याला आनंदाचं एक कोंदण दिलयंस तु...तुझं मनःपूर्वक स्वागत......तुम जो आए जिंदगी मैं बात बन गयी....यशवंत हो...गुणवंत हो....तुझ्या दीर्घायुष्यासाठी...तुझ्या सुयशासाठी ईश्वरचरणी...कोटीच्या कोटी....प्रणाम...वेलकम होम..माय फ्रेंड....

                 यस....मै काका बन गया........


No comments:

Post a Comment