कदंबाच्या झाडाखाली...
नातं...नातं म्हणजे नेमकं काय हो...जे आपण समजतो...ते का..जे आपण समजावं असं समाज आपल्याला सांगतो ते...नेमकं काय..?...एकूण आपली जडणघडण आणि समाजात असलेलं स्थान पाहिलं तर वर म्हटल्याप्रमाणे दोन्ही...आणि जर एखाद्या नात्यात दोन्ही गोष्टी नसतील किंवा असतील तर म्हणजे काहीसं व्यामिश्र नातं....पण अशी नाती फारशी पाहायला मिळत नाहीत..का हो..?...का आपण त्यांच्याकडे अशा पद्धतीने पाहायचं टाळतो..?...असंच एक काहीसं और नातं मध्यंतरी अनुभवायला मिळालं..अर्थात हे नातं फार पूर्वापार आपल्या सगळ्यांना माहिती आहे...अगदी परंपरागत...हजारो वर्षांपासून ...पण तरीही बऱ्याच वेळेला आणि बऱ्याच अंशी त्या नात्याकडे अगदी पाहावं तसं पाहिलं गेलेलं नाही...मला याचं कारण असं वाटतं..की आपल्यावर तसे संस्कारच केले गेले आहेत...उगाच कशाला रहस्य वाढवायचं...मी बोलतोय राधा आणि कृष्ण यांच्या नात्याबद्दल...या नात्याबद्दल आपण कायम ऐकलेलं असतं...वाचलेलं असतं...पाहिलेलं असतं...आणि त्यानुसार आपण त्या नात्याला जोखतो...त्यांचं अस्तित्व समजून घेण्याचा प्रयत्न करतो...कधी आपल्या संकुचित विचारांनुसार..जडणघडणीनुसार किंवा आपल्या बालसुलभ मनोवृत्तीनुसार...
कदंबाच्या झाडाखाली या कार्यक्रमाने मात्र या नात्याबद्दल एक वेगळाच विचार....एक वेगळा पर्सपेक्टीव्ह दिला...नव्हे...अंगात भिनवला...राधा आणि कृष्ण...एक नातं..असं की ज्याला खरं तर शब्दात बांधता येत नाही...आपले शब्द किंवा आपली व्यक्त करण्याची क्षमता त्यांना एक खूप चांगले मित्र मैत्रिण...एक खूप चांगलं युगुल ज्यांचं नातं मित्र आणि मैत्रिणीच्या कक्षेबाहेर जाणारं होतं अशा कक्षेत बांधतात...का ते होते... प्रियकर आणि प्रेयसी...? कुणास ठाऊक..? प्रत्येक नात्यात एक राजकारण आहे असं म्हणतात...खरंतर प्रत्येक नात्यात नाही..तर प्रत्येक गोष्टीत राजकारण आहे असं म्हणतात...there is politics in evrything..almost everything....मग राधा आणि कृष्ण यांच्या नात्यातही असं काही राजकारण होतं...? मग ते आपल्याला का दिसलं नाही...?..का दाखवलंच गेलं नाही....? का कृष्ण हा दैवी अवतार असल्याने त्यानं हे राजकारण फार चतुराईने मॅनेज केलं...केलं असेलंही..शेवटी द्वारकाधिश कृष्ण म्हणजे साक्षात देव...THE..ONE AND ONLY....अशक्य ते शक्य करण्याची कपॅसिटी असलेला...कुठल्याही रजनीकांतच्या किंवा हॉलिवूडच्या फिल्ममध्ये दिसले नसेल असे स्पेशल इफेक्ट्स करुन दाखवण्याची क्षमता असलेला...मग त्याला इतकी साधी गोष्ट जमली नसेल...विचार करण्यासारखी गोष्ट आहे...पण इथेच तर त्यांच्या नात्याची खरी मेख आहे...आपण अपेक्षा करतो किंवा आपण पाहू इच्छितो असं लिनिअर पद्धतीचं त्यांचं नातंच नाहीए...त्याचं नातं आहेच असं काही और..जगावेगळं...भौतिक जगाच्या व्याख्यांमध्ये न बसणारं...भौतिक जगाच्या इच्छा अपेक्षांपेक्षा पूर्णपणे वेगळं....मल्टिलेयप्ड...अर्थात बहुपदरी...बहुआयामी...कदाचित आपणं वाचलं पाहिलं असेल त्यातून आपणंच हे नातं सरधोपट पद्धतीने पाहिलं असेल...आपल्यालाच गरज आहे ते जरा वेगळ्या पद्धतीने पाहण्याची किंवा खरं तर अनुभवण्याची... एखादी गोष्ट मिळाली किंवा पूर्णत्वाला पोहोचली की ती मिळवण्यातली किंवा अनुभवण्यातली गंमत संपते...म्हणूनच का काय एखादं रिलेशनशिप पूर्ण झालं किंवा त्यात गरजेचे असलेले टप्पे पार पडले की मज्जा राहात नाही...म्हणजे आपल्याला गर्लफ्रेंड मिळाली की संपली हो मज्जा..ती मिळवताना केलेले कष्ट किंवा त्यासाठी खालेल्या खस्ता किंवा खरंतर ती मिळवण्यासाठी घेतलेल्या आणाभाका या फक्त नॉस्टॅलजिया पुरत्या ठरतात...म्हणूनच ती मिळत नाही तोपर्यंत मजा असते...किंवा मिळाली नाही तरंच खरंतर मज्जा असते...त्यामुळे ते रिलेशन खऱ्या अर्थानं सजीव, जिवंत किंवा लाईव्ह रसरशीत राहतं...मग ते एकतर्फी प्रेम असो किंवा दुतर्फी..म्हणजे दोन्हीकडून मान्य पण कुठल्या तरी बंधनामुळे किंवा अडचणीमुळे पूर्ण होऊ न शकलेलं...असं प्रेम जास्त काळ स्मरणात राहतं...
मुद्दा कदाचित भरकटत असेल पण राधा आणि कृष्णाचं प्रेम मला थोडसं या कॅटॅगरीतलं वाटतं...वेगवेगळ्या स्टेजमधून..वेगवेगळ्या अनुभवातून गेलेलं...वेगवेगळे अँगल दाखवणारं....म्हणजे वेगवेगळ्या गाण्यांमधून किंवा साहित्यातून आपल्याला राधा आणि कृष्णाचं प्रेम दिसतं...आणि त्यातून मिळतो तो प्रेमाचा किंवा अस्तित्वाचा एक रसरशीत हवाहवासा वाटणारा अनुभव..पण तरीही या सगळ्याला विरहाचं एक अंतर्मुख करणारं कोंदण आहे...कारण त्यांच्या या एकत्र येण्याला कुठल्याही नात्यांच्या नावात अडकवता येत नाही...बसवता येत नाही... गोकुळात लहानपणी एकत्र खेळलेले बागडलेले राधा आणि कृष्ण...यातही सगळ्या गोपिकांमध्ये कायमच राधेचं स्थान निराळं...याच निराळेपणातून राधा आणि कृष्ण कदाचित एकमेकांच्या जवळ आले असतील...मग लहानपणाच्या निरागसतेतून अजाणतेपणी नकळत..अगदी हळूवार...हवेत झुलत जाणाऱ्या सुंदर पिसाचा अलगद स्पर्श व्हावा त्याप्रमाणे त्यांच्या या नात्याचा पुढचा पदर आपल्यासमोर उलगडला...जरा ''लगान'मधलं राधा कैसे न जले हे सुंदर गाणं आठवा....
तो कान्हा काहे को उसे न बताए...
प्रेम की अपनी अलग बोली अलग भासा है...
बात नैनो से हो कान्हा की यही आसा है...
खरोखर डोळ्यांनी आणि स्पर्शाने अनुभवलेलं जरी हे नातं असलं तरी त्यात नक्कीच कुठेतरी एक दैवी अंश आहे..जो या नात्याला त्याचं एक वेगळेपणा..उदात्तपणा मिळवून देतो...एक असं वेगळेपण की ज्यामुळे त्यांच्या नात्याचा अगदी अपेक्षित शेवट न होता...ते आपल्या डोळयांच्या कडा पाणावतं...पण त्यात विरहाचं दुःख असण्यापेक्षा तृप्तीची एक उदात्त अनुभुती आहे...
आणि यात सगळ्यात पुन्हा कान्हा आणि राधा यांचं संगीताशी किंवा खरंतर कृष्णाच्या वेणुशी अर्थात बासरीशी असलेलं असोसिएशन...संगीत ही एक अशी शक्ती आहे की ती सगळ्या भवतालांना छेद देऊन आपल्या अस्तित्वाने सगळा आसमंत भरुन टाकते...फार प्रकर्षाने त्याच्या अस्तित्वाची जाणीव न करुन देता ते आहे याची जाणीव करुन देणारी भावना....युद्धभूमीवर लढायला निघालेल्या आपल्या लाडक्या कृष्णाला निरोप देताना राधेला हवे असतात ते त्याच्या वेणुचे सूर..अर्थात सुरांमधून जाणवणारं त्याचं अस्तित्व जे तिला प्रहर, काळ, परिस्थिती किंवा इतर कुठलीही गोष्ट सोडून थेट तिच्या काळजाला भेदू शकतात..तिला कडकडून भेटू शकतात...त्या सुरांच्या प्रत्येक कणाकणातून तिला तिच्या कन्हैयाच्या अस्तित्वाची जाणीव करुन देऊ शकतात...बसं अजून काय हवं...अशा प्रेमाला किंवा नात्याला कुठल्याही भौतिक गोष्टींची गरज लागत नाही...
असं एखादं तरी नातं आयुष्यात आपणं जपावं किंवा आपल्याला जमावं अशी इच्छा आहे...पण त्यासाठी एक कदंबाचं वृक्षंही हवं ज्याखाली बसून आपण अशा नात्याची ऊब अनुभवू शकतो....अर्थात मला वाटतं इथेही कदंबाचं वृक्ष ही देखील केवळ एक सांकेतिक गोष्ट आहे...नाहीतर बकाल, माणसांनी गजबजलेल्या आपल्या शहरांमध्ये...भवतालामध्ये असं कदबांचं वृक्ष कुठे मिळणार...?
तुमच्या मनाची आणि तुमच्या अंतरिक उर्मींची अशी एक मैफल जमली पाहिजे की ज्यासाठी व्यासपीठ म्हणून तुम्ही कदबांच्या झाडाखालच्या त्या छायेचा वापर केला पाहिजे....कदंबाच्या या झाडाखाली तुम्हाला शीतल छाया नक्की मिळेल..मग ते तुम्हाला वरळी सी फेसला मिळो किंवा अगदी तुमच्या घरच्या गॅलरीत...कारण दिसायला त्यात विरहाचा दाह आहे...पण तरीही तो शमवण्याची पूर्ण ताकद असलेला तृप्तीचा एक विलक्षण गारवा आहे...ज्याची एक झुळूक देखील हा दाह क्षणात कमी करु शकते...
स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाच्या त्या थंडगार ऑडिटोरियममध्ये मी ती झुळूक अनुभवली असं म्हणून मी उगाच लहान तोंडी मोठा घास घेणार नाही...कारण ती झुळूक निश्चितपणे तिथल्या चील्ड ए.सीची असणार..पण तरीही अशी एखादी झुळुक असते...या गोष्टीवर माझा विश्वास मात्र नक्की बसला...त्यासाठी आता खरोखर अनुभवाचं अनुभूतीत रुपांतर कधी होतंय...आणि त्या झुळुकेचा तो दैवी स्पर्श केव्हा अंग मोहरवुन टाकतोय...याचीच वाट पाहतोय...पण त्यासाठी तिथपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे...मनाची...विचारांची तशी बैठक बांधली जाणं गरजेचं आहे....
पण ती बसू शकेल..नक्की..त्यासाठी एकदा तरी या कदंबाच्या झाडाखाली बसून कृष्णाच्या मुरलीच्या बॅकग्राऊंड म्युझिकबरोबर ते क्षण अनुभवणं गरजेचं आहे...माझा शोध सुरुच राहिलं...पण तुम्हीही जरा प्रयत्न करा....तुम्हालाही नक्की मिळेल...तुमचं कदंबाचं वृक्ष....
स्वानंद कुलकर्णी
१५.०२.२०१२


No comments:
Post a Comment